न समजलेलं समाधान



"ठेवले आनंती तैसेची रहावे, चित्ती असुद्यावं समाधान" — असं तुकोबा सांगून गेले.
पण प्रश्न असा की समाधान म्हणजे नक्की तरी काय?

जगात लाखो जीव आहेत, प्रत्येकजण जन्म घेतो आणि एका अदृश्य शर्यतीत सामील होतो.
लहानपणी शिक्षण, तरुणपणी नोकरी किंवा उद्योगधंदा, त्यानंतर पैसा, प्रतिष्ठा, घर, गाडी…
ही मालिका कधीच थांबत नाही.

लोक म्हणतात: "समाधानच सुख आहे; आहे त्यात समाधान मानावं."
ऐकायला अगदी सोपं वाटतं. पण व्यवहारात तसं घडतं का?
भाड्याचं घर असेल तर स्वतःच्या दोन खोल्या हव्या वाटतात.
दोन खोल्या मिळाल्या की छोटा बंगला हवा वाटतो.
बंगल्यात राहत असताना मोठ्या शहरात दुसरं घर हवंसं वाटतं.
माणसाची इच्छा कधी संपते का?

मग खरं समाधान म्हणजे "इच्छा संपवणं" का?
की "इच्छा असूनही त्या इच्छेच्या मागे न धावता स्वतःला संतुलित ठेवणं" हा त्याचा खरा अर्थ आहे?

समाधान जर फक्त "आहे त्यात जगणं" असेल, तर माणसाची प्रगतीच थांबेल.
कारण विजिगीषु वृत्ती म्हणजेच जिजीविषा — तीच आपल्याला पुढे नेत असते.
एखाद्या दिशेविना जहाज भरकटत राहतं, तसं आयुष्य होईल.
मग ते खरंच समाधान म्हणता येईल का?

कदाचित समाधान म्हणजे इच्छा आणि वास्तव यामधील संतुलन.
इच्छा नष्ट करायच्या नाहीत, पण त्यांचं ओझं होऊ द्यायचं नाही.
"माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी ऋणी आहे" हे मान्य करणं, आणि "यापुढे मी काय साध्य करू शकतो" यासाठी प्रयत्न करणं.
याचं नाव समाधान.

म्हणूनच तुकोबांचं वचन हे आळशीपणाचं समर्थन नाही, तर स्वतःला जाणून घेत जगण्याचा मंत्र आहे.
समाधान म्हणजे न थांबणं आणि न धावणं यामधली एक सुंदर चाल.
एक चाल जी आपल्याला सुख, शांती आणि प्रगती — तिन्ही देऊ शकते.
@karan_r_kadam

Comments

Popular posts from this blog

Sandhan, the valley of shadows

आणि भले भले वाघ मी रडताना पाहिले ..